new-img

नवीन स्थापन झालेल्या महसूल मंडळांमध्येही दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर!

खरीप हंगाम-2023 मध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेल्या 1021 मंडळांपैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेली नाहीत, अशा नवीन महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिली.

नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे, यासाठी अशा प्रस्तावांवर निर्णय घेण्याकरिता मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. या मंत्रिमंडळ उपसमितीस दुष्काळी कालावधीसह भविष्यात दुष्काळ उद्भवल्यास, त्या दुष्काळी कालावधीकरिता तातडीने उपाययोजना सुचविण्यासाठी, सनियंत्रण ठेवण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार समितीने हा निर्णय घेतला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.